मोठ्या पदासाठी योग्यता । मराठी गोष्टी । chan chan goshti

मोठ्या पदासाठी योग्यता । मराठी गोष्टी । chan chan goshti

एकदा, खलिफा हजरत उमर यांनी त्यांच्या ताब्यातील एका राज्याच्या राज्यपाल पदी एका व्यक्तीची नेमणूक केली. आपल्या पदाचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी तो हजरत उमर यांच्याकडे आला. त्याने त्यांच्याकडून नियुक्ती पत्र घेतले.

त्यावेळी त्या परिसरातील एक लहान मुलगा खेळत-खेळत तेथे आला. हजरत उमर यांनी त्याला आपल्या हाताने उचलून घेतले आणि स्वतःच्या मुलासारखे त्याचे लाड करायला सुरुवात केली.

जेव्हा त्या व्यक्तीने ते पाहिले तेव्हा तो म्हणाला, “हजरत! मला आठ मुले आहेत, पण मी त्यांना कधी जवळही घेतलेले नाही, आणि आपण मात्र परक्या मुलालाही जवळ घेता.” त्याचे हे शब्द ऐकल्यावर हजरत उमर यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ते त्या माणसाला म्हणाले, “मी तुला जे नियुक्ती पत्र दिले आहे, ते जरा दाखव.”

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

प्रामाणिकपणा

येथे क्लिक करा

त्याने ते नियुक्तीपत्र हजरत उमर यांना दिले. ते नियुक्तीपत्र हातात पडताच त्यांनी लगेचच ते फाडून टाकले आणि त्याला म्हणाले, “तू एक पिता असूनही तुझ्या अंतःकरणात तुझ्या मुलांसाठीही प्रेम नाही, तर मग तुझ्यासारखा माणूस आपल्या प्रजेवर प्रेम कसे करणार ? तू राज्यपाल बनण्यासाठी योग्य नाहीस.”

तात्पर्य : एखाद्या माणसाची योग्यता अगदी लहान-सहान गोष्टींतूनही तपासता येते.