मनाची श्रीमंती,manachi shrimanti,marathi goshti
एका विद्वान माणसाला स्वत:च्या ज्ञानाची खूप घमेंड होती. तो एकदा आगगाडीतून प्रवास करीत असताना, त्याला आपल्या शेजारी एक अडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. तो विद्वान माणूस त्या अडाणी शेतकऱ्याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला.
थोडा वेळ ती थट्टा सहन केल्यावर तो शेतकरी त्याला म्हणाला, “साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी अडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त शंभर रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पाचशे रुपये द्यायचे. आहे कबूल ?”
हे ऐकून तो विद्वान माणूस आनंदला आणि सहप्रवाशांवर छाप मारायची सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे, असा विचार करून त्या शेतकऱ्याला म्हणाला, “तुझी कल्पना मला मान्य आहे.
आता पहिलं कोडं तू मला घाल. “
शेतकऱ्यानं विचारलं, “ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता?”
या कोड्याचं उत्तर देता न आल्यानं तो विद्वान काहीसा ओशाळून म्हणाला, “बाबा रे, मी हरलो. हे घे पाचशे रुपये, आणि या कोड्याचं उत्तर तू मला सांग.”
आपणास ही गोष्ट देखील आवडेल
मोठ्या पदासाठी योग्यता
त्या विद्वानाने दिलेल्या पाचशे रुपयांपैकी चारशे रुपये स्वतःच्या खिशात टाकून, उरलेले शंभर रुपये त्याच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, “मलासुद्धा या कोड्याचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे शंभर रुपये तुम्हाला देत आहे.”
एक अडाणी शेतकऱ्याने असे चकविल्यामुळे फजिती झालेला तो विद्वान माणूस तेथून उठला व दुसऱ्या डब्यात
जाऊन बसला.
तात्पर्य : निरक्षर माणसाकडेही शहाणपण असू शकते, हे लक्षात ठेवावे.