[ad_1]
नीरज पंडीत
स्वयंपाक म्हणजे केवळ मुलींनी शिकण्याची कला आहे, असा समज आजही भारतात अनेक भागांमध्ये दिसून येतो. मात्र लॉकडाउनच्या काळत अनेक पुरुष मंडळींनी स्वयंपाकघराची धुरा समर्थपणे सांभाळली. यामुळे अनेक घरातील स्वयंपाकाची चवच बदलली. याबाबतचे टि्वट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले आणि संपूर्ण देशाचं लक्ष पुरुषांच्या पाककौशल्याकडे गेलं.
व्हर्च्युअल बोर्डरुम मीटिंग, कार्यालयाची कामं यात दिवस घालवल्यानंतर संध्याकाळच्या वेळी काय करायचं हा प्रश्न अनेक तरुणांना पडला होता. मग त्यापैकी काहींनी मोबाइल फोनला जवळ केलं, तर काहींनी स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि संध्याकाळ मसालेदार केली. लहानपणी कधीतरी लावलेला कुकर किंवा बनवलेले दोन मिनिटवाले नूडल्स याचं कौतुक मिरवणारे तरुण आता आपण केलेली भाजी, पुलाव आणि पोळी ट्विटरवर पोस्ट करू लागलेत. यामुळे आता पुरुषांची शेफ आर्मी तयार झालीय.
पुरुष स्वयंपाक करत असताना रोज नवा प्रयोग करत असल्याचं टि्वटरनं केलेल्या एका पाहणीत दिसून आलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत LetMenCook हे हॅशटॅग ट्रेडिंग झालेत. यात ‘लेट मी कूक चॅलेंज’ही फिरत आहे. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनीही ट्विटरवरून हे चॅलेंज दिलं आहे. यामुळे याची अधिकच चर्चा सुरू झाली. यावर सुरू असलेल्या चर्चेत नामांकित शेफ आणि सेलिब्रिटी सहभागी होऊ लागलेत. अनेकांनी स्वयंपाकाच्या टिप्स आणि केलेले वेगवेगळे प्रयोगही शेअर करण्यास सुरुवात केलीय. महिलांनीही याला प्रतिसाद देत पुरुषांचं कौतुक केलं आहे. यात दक्षिणेतील अभिनेते चिरंजीवी, राम चरण, व्यंकटेश डग्गाबट्टी यांची आघाडी असल्याचंही ट्विटरनं स्पष्ट केलं आहे.
नर्सना सलाम
मंगळवारी साजऱ्या झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिना’च्या निमित्तानं ट्विटरवर नर्सना शुभेच्छा देण्यात आल्या. करोनाशी लढा करण्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यांमध्ये डॉक्टरांबरोबरच परिचारिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. यामुळे मंगळवारी दिवसभर नर्सना शुभेच्छा देऊन त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ट्विट्सचा ट्रेंड पाहायला मिळाला.
[ad_2]
Source link