इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 34
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका 17
समजून घेऊ या : द्रव्य, मूलद्रव्य, मूलद्रव्यांच्या संज्ञा
संदर्भ: इयत्ता सातवी प्रकरण 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे अध्ययन निष्पत्ती आपल्या दैनंदिन वापरांचे स्वरूप, गुणधर्म, अवस्था व त्यांचे होणारे परिणाम यांबाबतची माहिती
स्पष्ट करता येणे.
लक्षात घेऊ याः
द्रव्यः वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात. वस्तू ज्या पासून बनलेली असते, त्याला शास्त्रीय परिभाषेत द्रव्य असे म्हणतात. द्रव्य हेच वस्तूंच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असते.
हे करून पहा. एका ग्लासमध्ये काठोकाठ पाणी भरा. त्यात लहान दगड टाका. काय होते? 2. एक तराजू घ्या. त्याच्या एका पारख्यात लहान दगड व दुसऱ्या पारड्यात मोठा दगड ठेवा. कोणते पारडे खाली जाईल? का?
वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच घटक असतो. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ (Substance) असे म्हटले जाते. जसे सोने, हिरा, पाणी, चुनखडी. काही द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात, त्यांना मिश्रणे (Mixtures) म्हणतात.
मुलद्रव्य: सर्वच पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. पदार्थांचे लहान कण म्हणजे रेणू. ज्या पदार्थाच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, त्या पदार्थाना मूलद्रव्ये म्हणतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म : 1. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही.
2. मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात.
3. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान व आकारमान वेगवेगळे असते.
निसर्गात ऑक्सिजन वायुरूपात आढळतो. ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. हवेमध्ये ऑक्सिजन हे नेहमी रेणू स्वरूपात सापडतात.

मूलद्रव्यांच्या संज्ञा : मूलद्रव्याला संबोधण्यासाठी वापरलेल्या संक्षेपाला त्या मूलद्रव्याची संज्ञा म्हणतात. मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत बॉलिअस या शास्त्रज्ञाने सुरू केली. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवतात. साधारणपणे, मूलद्रव्याच्या इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमधील पहिले अक्षर हि त्याची संज्ञा असते, जसे हायड्रोजनची (Hydrogen) संज्ञा H आहे.
जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावातले पहिले अक्षर सारखे असते, तेंव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरतात. अशावेळी पहिले अक्षर मोठ्या लिपीत तर दुसरे अक्षर दुसऱ्या छोट्या) लिपीत लिहितात. जसे N ही संज्ञा नायट्रोजन (Nitrogen) दर्शविते, तर Ni संज्ञा निकेल (Nickel) दर्शविते. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा फक एकच अणू दर्शविते.

सराव करू या :
- खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
i) दिलेल्या गटातील वेगळा घटक शब्द ओळखा. कार्बन, सल्फर, सिलिकॉन, क्लोरीन
ii) पाणी, सरबत, लोखंड, पोलाद, कोळसा, हवा, मीठ, तांबे, पितळ, माती यांमधील मिश्रणे कोणती?
- ‘C’ या इंग्रजी मुळाक्षरांपासून सुरु होणाऱ्या मूलद्रव्यांची नावे लिहून त्यांच्या संज्ञा लिहा.
- हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती ? त्यांच्या संज्ञा लिहा.
- शिसे आणि कथिल या मूलद्रव्यांची संज्ञा त्यांच्या लॅटिन नावावरून घेतल्या आहेत, त्या मूलद्रव्यांची लॅटिन इंग्रजीतील नावे शोधा आणि त्यांच्या संज्ञा लिहा.
