कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र या काळात प्रत्येक शाळेने दररोज किमान चार तासिकांचे नियमित वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी घ्यावी व त्यांचे मूल्यमापन करावे, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याला शिक्षकांकडून विरोध होत आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याशी मोबाईल व ऑनलाईन माध्यमातून संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याप्रमाणे शिक्षक, मुख्यध्यापकांनी आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम अॅप डाऊनलोड करून इयत्ता निहाय ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, त्यातील शैक्षणिक माहिती व आवश्यक अन्य सूचनांकरिता mcgmedu चॅनल सबस्क्राईब करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
रोज चार तासाचे वेळापत्रक
रोज चार तासाचे वेळापत्रक तयार करून शिक्षकांनी पीडीएफ स्वरूपात विद्यार्थ्यांना अभ्यास सामग्री पाठवायची आहे. त्यानंतर त्याचे ऑनलाईन पद्धतीने मूल्यमापन करायचे आहे. शिक्षक आपली ही जबाबदारी योग्यपणे पार पाडत आहे का त्यावर मुख्याध्यापकांनी नजर ठेवायची आहे.
शिक्षकांनी रोज चार तास युट्युब किंवा फेसबुक लाईव्हद्वारे शिकवायचे आहे. बालभारतीच्या संकेतस्थळावरून सर्व सामग्री डाउनलोड करून प्रश्नपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांना पाठवायची आणि ते विद्यार्थ्यांकडून पुन्हा मागवून घेत त्यांची तपासणी करत विद्यार्थ्यांना गुण द्यायचे आहेत. शाळा सुरू होत नाही तोपर्यंत हे उपक्रम सुरू राहणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी विसरावी लागणार आहे.
निकाल व्हाट्स अॅपवर
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार पहिली ते आठवीच्या प्रथम सत्राच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून वार्षिक निकाल तयार करण्यात येणार आहे. हा निकाल व्हाट्सअॅपसारख्या माध्यमातून जाहीर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन शिकवण्याची सक्ती नको
मनपा शाळेत किंवा खासगी अनुदानीत शाळेत शिकणारी नव्वद टक्के मुले झोपडपट्टीत राहणारी आहेत. अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत.
गेल्या शैक्षणिक वर्षाचा संपूर्ण अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकून झालेला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान झालेले नाही. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुट्टीच्या कालावधीत पुढच्या वर्षीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपण शिकवायला सांगत आहात. हे मानसशास्त्रीय दृष्टया अयोग्य आहे. त्यांचे मूल्यमापन करण्याच्याही सुचना आहेत. हे गंभीर आहे. शिक्षण विभागाने परिपत्रक मागे घ्यावे.
– जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती
source -Sakal