[ad_1]
परदेशात शिकायला किंवा नोकरीसाठी गेलेल्या मुला-मुलीशी संवाद असो, किंवा व्यावसायिक बैठक किंवा संवाद असो किंवा अगदी परदेशात असलेल्या आपल्या नातवंडांना शुभंकरोती शिकवणे असो, पुणेकर ‘स्काइप’, ‘फेसटाइम’, ‘हँगआउट’ यासारख्या अॅप्लिकेशन्सचा वापर करून व्हिडिओ संवाद साधत आहेत. त्यामुळे भौगोलिक अंतर प्रचंड असले, तरी या डिजिटल माध्यमातून नात्यांचा गोडवा मात्र, टिकून राहिला आहे.
बहुसंख्य पुणेकर जगभरात पसरलेल्या आपल्या नातेवाइकांशी संपर्कात राहण्यासाठी सध्या व्हिडिओ कॉलबरोबरच, ‘स्काइप’, ‘फेसटाइम’ अशा सुविधांचाही वापर करत आहेत. यामध्ये बोलण्याबरोबरच समोरची व्यक्ती आपल्याला स्क्रीनवर पाहता येत असल्याने हे माध्यम सर्वांच्याच सोयीचे ठरते आहे. त्याचबरोबर ही अॅप्लिकेशन्स वापरण्यासाठी फारशा तांत्रिक कौशल्यांचीही आवश्यकता नाही. त्यामुळे या अॅप्लिकेशन्सचा वापर वाढतो आहे. काही जण दररोज, तर काही जण आठवड्यांतून दोनदा किंवा तीनदाही या माध्यमातून संवाद साधतात. फोन करणे महाग असल्याने याशिवाय फोनमध्ये त्या व्यक्तीला पाहता येत नसल्याने या पर्यायाला अधिक पसंती मिळत आहे.
व्हिडिओ कॉलिंगचे तंत्रज्ञान वापरणे अतिशय सोपे आहे. एक दोन वेळा माहिती घेऊन ज्येष्ठ नागरिकदेखील त्याचा सहज वापर करू शकतात. त्यामुळे आजी-आजोबाही परदेशातील आपल्या नातवंडांशी गप्पा मारू शकतात. ते अगदीच लहान असतील, तर त्यांना गाणी, गोष्टी ऐकवू शकतात. कोथरूडमधील सुलभा चव्हाण या आजींनी तर स्काइप कॉलद्वारे न्यूझिलंडमध्ये राहत असलेल्या आपल्या तीन वर्षांच्या रिया या नातीला ‘शुभंकरोती कल्याणम’ ही प्रार्थना आणि काही श्लोकही शिकवले आहेत. आजी आणि नातीचा हा डिजिटल संवाद अगदी दररोज न चुकता सुरू असतो. ‘मी नुकतीच तीन महिने नातीकडे राहून आले. पण सारखे तिकडे राहणेही शक्य नाही. आम्हाला एकमेकींचा खूप लळा आहे. त्यामुळे ‘स्काइप’द्वारे आम्ही दररोज भेटतो,’ असे त्या सांगतात.
‘व्हिडिओ शेअरिंगची सोय असल्याने आम्ही एकेमकांना पाहू शकतो. अर्थातच, प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळाच असला, तरी यामाध्यमातून आम्ही एकत्र असल्यासारखेच वाटते. प्रत्यक्षात भौगोलिकदृष्ट्या आम्ही कितीही दूर असलो, तरी हे अंतर संवादाने मिटून जाते. त्यामुळे आम्ही नेहमी ‘स्काइप’ किंवा व्हिडिओ कॉलची वाट पाहतो. तंत्रज्ञानामुळे हा व्हिडिओ संवाद शक्य आणि सहजसोपादेखील झाला आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून माझे आई-बाबा आणि बहीण आम्ही दोन ते तीन दिवसांनी एकदा तरी आवर्जून गप्पा मारतो,’ असे पाषाण येथील पंचवटी परिसरात राहणारा, तसेच सध्या नोकरीनिमित्त जर्मनीत असलेला ऋत्विक कुलकर्णी याने सांगितले.
‘भारतामधील कमी दर्जाची इंटरनेट सेवा हा यातील प्रमुख अडथळा आहे. इंटरनेटचा वेग कमी असेल तर हा व्हिडिओ अस्पष्ट होतोच शिवाय त्यात अडथळेही येतात. त्यामुळे संवादाऐवजी मनस्तापही होतो,’ असेही ऋत्विकने नमूद केले.
‘व्हिडिओ कॉलिंगचे माध्यम सोयीस्कर आणि वापरण्यास सोपे आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टीनेही त्याचा चांगला वापर करता येतो. तुमचे वरिष्ठ अथवा तुमचे क्लाएंट दूर असले, तरी तुम्हाला तुमचे मत अधिक स्पष्टपणे मांडणे सोपे जाते. तर कौटुंबिक किंवा मित्रांशी संपर्क साधण्यासाठी फोनवर बोलण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून होणारा संवाद अधिक आनंददायी असतो,’ असे व्यावसायिक यशोधन पानसे याने सांगितले.
सॅमसंग गॅलेक्सी M21 चा आज दुपारी पहिला सेल
[ad_2]
Source link