[ad_1]
केंद्र शासनाच्या ऊर्जामंत्रालयांतर्गत जड उद्योग विभागाने महामेट्रोच्या परिसरात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसविण्याकरिता परवानगी दिली. चार्जिंग पॉइंट स्थापन करण्यासंबंधीचा करार महामेट्रो आणि ऊर्जादक्षता सेवा लिमिटेडदरम्यान लवकरच करण्यात येणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
मेट्रो स्टेशन परिसर येथे चार्जिंग पॉइंटची स्थापना आणि सुरुवात जानेवारी २०२१पर्यंत पूर्ण केली जाईल. ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड विभागाच्या नियोजनानुसार याचे संपूर्ण डिझाइन, स्थापना, सुरुवात आणि चार्जिंग स्टेशन मेट्रो स्टेशन परिसर येथे चालविण्याचा कालावधी १० वर्षे असून या माध्यमाने महामेट्रोला महसूल प्राप्त होणार आहे.
याठिकाणी स्थापित करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिकल वाहनांसाठीचे चार्जर्स मेट्रोच्या फिडर सर्व्हिससाठी उपयोगी पडतील. याआधी ८ ऑगस्ट रोजी महामेट्रो आणि ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेडदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला होता. ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड ही कंपनी भारत सरकारच्या ऊर्जा विभागाच्या अधीन असलेली सार्वजनिक उपक्रम राबविणारी कंपनी आहे.
प्रदूषण होणार कमी!
स्टेशन परिसरात इलेक्ट्रिकल वाहनांनकरिता करण्यात आलेल्या तरतुदीनुसार २ व्होल्ट, ३ व्होल्ट आणि ४ व्होल्ट (कार) वापरल्या जाऊ शकतात. ऊर्जा विभागाच्या निर्देशांनुसार सर्वप्रकारचे इलेक्ट्रिकल वाहनाचे चार्जर्स या परिसरात उपलब्ध असतील. मुख्य म्हणजे महा मेट्रोच्या स्टेशन परिसरातील सोलर पॅनेलने इलेक्ट्रिक वाहन चार्ज होऊ शकतील. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, असा महामेट्रोचा दावा आहे.
पर्यावरणसंवर्धनासाठी पाऊल
देशाला दरवर्षी सुमारे ४१ हजार कोटी रुपयांचे इंधन आयात करावे लागते. वाहनक्षेत्र झपाट्याने इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असावे, असे धोरण निती आयोगाने आखले आहे. येत्या दहा वर्षांत सर्व वाहने इलेक्ट्रिकवर आणण्याचा मानस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता. येता काळ हा या इलेक्ट्रिक वाहनांचाच असेल. मेट्रो रेल्वेसारखी सर्वाजनिक वाहतूक असो वा इलेक्ट्रिक वाहने, पुढील दहा वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या मागणीत मोठी घट होणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी हे मोठे पाऊल असल्याचेही आता बोलले जात आहे.
मेक इन इंडिया! गुजरातेत बनणार हवेत उडणारी पहिली कार
[ad_2]
Source link