[ad_1]
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटानंतर आणि लॉकडाऊन उठवल्यानंतर देशात अधिकाधिक लोक कार खरेदी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा धोका आणि सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करण्याच्या नियमामुळे मारुती सुझुकी, होंडा, टोयोटा आणि टाटा मोटर्ससांरख्या प्रमुख वाहन निर्माता कंपन्यांना खासगी वाहनांसाठीची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. कंपन्यांचं म्हणणं आहे की, लोक सार्वजनिक वाहनांपासून स्वत:ला दूर ठेऊ शकतात.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाला, लॉकडाऊन संपल्यानंतर कमी किंमतीच्या कारची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक (विपणन व विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, लोक सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खासगी वाहनांना प्राधान्य देतील. अनेक ग्राहकांच्या केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
लोक खासगी वाहतुकीसाठी छोट्या किंवा कमी किंमतीच्या गाड्या खरेदी करण्यास प्राधान्य देतील. विशेषत: प्रथमच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल, असंही ते म्हणाले.
अशाचप्रकारची शक्यता होंडा कार्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विपणन-विक्री संचालक राजेश गोयल यांनीही व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, लोक कोरोना व्हायरसबाबत अधिक सतर्क राहतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीऐवजी लोक खासगी वाहनांना अधिक महत्त्व देतील. त्यामुळे कारची विक्री वाढू शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. वेगवेगळ्या प्रकारातील नवीन कारबरोबरच लोक प्रमाणित वापरलेल्या कार खरेदी करण्याकडेही लक्ष देतील, असंही ते म्हणाले.
टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, लोक कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खासगी वाहनांकडे वळू शकतात. मात्र सध्या ग्राहकांची मागणी मर्यादित आहे हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे. जोपर्यंत सरकार मागणी वाढविण्यासाठी उपाययोजना करत नाही तोपर्यंत, अशाच प्रकारची परिस्थिती राहू शकते.
कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी होईल, असं टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत खासगी वाहनांची मागणी वाढू शकते, असंही ते म्हणाले.
[ad_2]
Source link