शिक्षण सेवकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याची शिफारस


2000 पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. त्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून कायम करून शासन नियमानुसार वेतन दिले जाते. पूर्वीच्या मानधनात सप्टेंबर 2011 ला वाढ झाली. त्यानुसार सध्या प्राथमिक शिक्षकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना आठ हजार रुपये व उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जाते. नऊ वर्षांत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केलेली नाही. त्यामुळे ही वाढ करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शिक्षण संचालकांनी मानधनात दुप्पट वाढ करण्याची शिफारस केली आहे. 


राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. सदर वेतन आयोगातील तरतुदीनुसार मूळ वेतनात 2.57 टक्के वाढ केली, मात्र मानधनावर कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू नाहीत. त्यामुळे वाढती महागाई लक्षात घेऊन मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांना सध्या मिळत असलेल्या मानधनात किमान दुपटीने वाढ करण्याची शिफारस केली आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी मानधनवाढीचा हा प्रस्ताव शासनास सादर करतील. त्यानंतर शासन याबाबत अंतिम निर्णय घेईल. 

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

1 thought on “शिक्षण सेवकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याची शिफारस”

Leave a comment