रानभाज्यांची ओळख व पाककृती

मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे ५५ प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे.

भारतातील जंगली आणि पहाडी भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात ४७ जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी १५३० पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत.

पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात. या वनस्पती आदिवासींनी व शेतकऱ्यांनी शोधुन काढल्या आणि अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही. या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

रानभाज्यांबाबत शहरातील नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या भाज्यांची ओळख आणि त्यांचे गुणधर्म जाणुन घेण्यासाठी या संकेत स्थळावर  सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे .