कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये दहावीच्या काही विषयांच्या उत्तरपत्रिका टपाल कार्यालयात व परीक्षा केंद्रावर अडकल्या होत्या. त्या आता संबंधित विषय शिक्षकांना दिल्या जात असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी व बारावीचे निकाल 20-25 दिवस उशिरा लागेल.
मात्र, राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचे नियोजन असून कोरोनाची स्थिती पाहून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातील.
वस्ती तथा डोंगरी भागातील शाळांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी असले, तरीही कोणतीच शाळा बंद केली जाणार नाही. त्यामुळे कोणताही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
शिक्षण घेण्याचा सर्व विद्यार्थ्यांना अधिकार असून वस्ती अथवा डोंगरी भागातील शाळा अन्य ठिकाणच्या शाळांपासून खुप दूर आहेत. त्या मुलांना त्याठिकाणी नेण्यास अडचणी येतील, त्यामुळे यंदा पटसंख्या कमी आहे म्हणून कोणतीच शाळा बंद केली जाणार नाही.
तत्कालीन सरकारने अशा शाळांमधील विद्यार्थी वाहनाच्या माध्यमातून मोठ्या शाळांमध्ये आणून कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तसे करणे सद्यस्थितीत शक्य नाही आणि तसे आपण करणारही नाही. कारण, शिक्षण घेणे सर्वांचा अधिकार व हक्क आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Text Addकोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रेड झोन वगळता अन्य ठिकाणच्या शाळा सुरु करण्याचे नियोजन आहे. तर कोरोनाचे संकट हद्दपार होईपर्यंत, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचेही नियोजन आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ या पर्यायाचाही विचार केला जात असून शिक्षक संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ऑनलाइन धडे देतील. नवीन विद्यार्थ्यांचे विशेषत: रेड झोनमधील विद्यार्थ्याचे प्रवेश ऑनलाइन केले जातील, असेही त्या म्हणाल्या.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या…
- विद्यार्थी कमी असले तरीही कोणतीच शाळा बंद केली जाणार नाही
- डोंगरी भागात अथवा वाड्या-वस्त्यांपासून अन्य शाळा खुप लांब असल्याने त्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत
- वस्ती अथवा डोंगरी भागातील शाळेत चार
-पाच जरी मुले असतील तरी त्या शाळा सुरुच राहतील
- कोणतेही शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत; संकट काळात शिक्षकांनी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केली अकरावी प्रवेशाची संपूर्ण तयारी
- दहावी-बारावीचा निकाल लागताच सुरु होईल ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
- लॉकडाउन संपल्यानंतर आणि कोरोनाचे संकट राज्यातून हद्दपार होवून शाळा नियमीत सुरु झाल्यानंतर रिक्त पदांची भरती केली जाईल