खरे जीवनमूल्य khare jivan mulya marathi goshti
जपानमधील एक वृद्ध झेन गुरू आपल्या आश्रमामध्ये शिष्यांना युद्धकलेचे शिक्षण देत असत.
एकदा युद्धकलेमधे तरबेज असलेला एक नवयुवक तेथे आला. युद्धकलेच्या स्पर्धेमध्ये त्याने कधीही पराभव पत्करला नाही. या शहरात तो यासाठीच आला होता की, या आश्रमातील झेन गुरूला खिजवून त्यांना लढायला प्रवृत्त करून पराभूत करायचे व अजिंक्य म्हणून ख्याती मिळवायची यासाठीच तो आला होता.
आल्या-आल्या तो गुरूंना ललकारू लागला, खिजवू लागला. ते पाहून आश्रमातील सर्व शिष्य जमा झाले. त्याचे खिजवणे ऐकून प्रत्येकाच्या मुठी रागाने आवळू लागल्या होत्या.
गुरू व तो युवा योद्धा समोरासमोर उभे ठाकले. त्यांना पाहून युवा योद्धा त्वेषाने अपशब्द उच्चारत त्या गुरूंना अपमानित करू लागला. सर्वजण गुरूंकडे पाहू लागले. त्यांना वाटले गुरू आपल्याला त्याचा समाचार घेण्याची आज्ञा देतील; पण गुरू अगदी शांतपणे उभे होते. त्यांचा शांतपणा, धीरगंभीरपणा पाहून युवायोद्धा मनातून घाबरला. असा शांतपणा त्याला अपेक्षित नव्हता. तो शांतपणा सहन न होऊन तो युवा योद्धा न लढता निघून गेला.
यानंतर सारे शिष्य गुरूजवळ आले आणि नाराजीने विचारू लागले, “तुम्ही त्या दुष्टाला शासन का केले नाही? निदान आम्हाला आज्ञा तरी द्यायची होती. “
आपणास ही गोष्ट देखील आवडेल
मूर्खाचा मालक
गुरू म्हणाले, “हे पहा, जर एखादा तुमच्याकडे काही सामान घेऊन आला आणि ते तुमच्या गळ्यात मारू लागला, आग्रह करू लागला; परंतु त्याच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही जर प्रतिसाद दिला नाही तर काय होईल? तो त्याचे सामान घेऊन परत जाईल.
मग हेच तर मी या युवकाच्या बाबतीत केले. त्याने आणलेल्या ईर्षा, अपमान, आव्हान या गोष्टी मी घेतल्याच नाहीत. त्यामुळे त्याला त्या परत न्याव्या लागल्या, म्हणजे त्या त्याच्याकडेच राहिल्या. म्हणजेच एका अर्थाने तो पराभूत झाला. “
तात्पर्य : युद्ध असो वा स्पर्धा, त्यांना जिंकण्यासाठी क्रिया-प्रतिक्रिया, हल्ले- प्रतिहल्ले केलेच पाहिजेत असे नाही. युद्ध टाळण्याचा मुत्सद्दीपणा दाखवणे हेच खरे जीवनमूल्य आहे.