[ad_1]
आयटी इंजिनीअर असलेल्या अभिजित मुरुडकरसाठी चित्रकला ही पॅशन आहे. काही विशेष अंकांसाठी त्यानं आजवर काम केलं आहे. आपल्यातल्या कलेचा वापर करून घेत त्यानं चित्रकलेचे ऑनलाइन धडे द्यायला सुरुवात केली आहे. लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी तो एका इन्स्टिट्यूटमध्ये व्हीएफएक्स, ग्राफिक्स, अॅनिमेशन, गेमिंग या विषयातला फाउंडेशन कोर्स शिकवत होता. मात्र लॉकडाउनमध्ये सारं काही ठप्प झाल्यावर पैसे कसे कमवायचे असा प्रश्न अभिजितलाही पडला होता. यावर उपाय म्हणून त्यानं चित्रकलेचे ऑनलाइन वर्ग सुरू केले. बेसिक स्केचिंग, परसपेक्टीव्ह, लाइट स्टडी, कलर स्टडी अशा काही गोष्टी तो ऑनलाइन शिकवतो. तो म्हणतो की, ‘करोनामुळे आपल्या सगळ्यांवरच काही बंधनं आली आहेत. पण, त्यातून मार्गही आपल्यालाच काढायला हवा. ऑनलाइन स्वरूपात गोष्टी कशा शिकवता येतील याचा मी अभ्यास केला. ही पद्धत लोकांसाठी सोयीची आहे आणि त्यामुळे मला मिळणारा प्रतिसादही चांगला आहे.’
अभिनेत्री अक्षया नाईकला तुम्ही आजवर हिंदी मालिकांमध्ये पाहिलं असेल. मात्र सध्या ती लहान मुलांचे अभिनयाचे ऑनलाइन वर्ग घेतेय. स्वतः अभिनयाचं ऑनलाइन प्रशिक्षण घेत असताना तिला असं वाटलं की आपल्याला येत असलेल्या गोष्टींचा वापर अशा पद्धतीनं करता येऊ शकतो. ती म्हणते की, ‘लॉकडाउनबद्दल सतत चिंता व्यक्त करत राहण्यापेक्षा मला येत असलेल्या गोष्टी ऑनलाइन शिकवाव्या आणि त्यातून चार पैसे कमावावेत यासाठी मी प्रयत्न करत आहे. काही मुलांच्या शाळा ऑनलाइन सुरू असल्यामुळे, मी त्याचा अंदाज घेऊन बॅचेस घेते. मुलांना शिकवायचं, म्हणजे मलाही अभ्यास करावा लागतो. त्यामुळे माझा अभिनयाचा सराव होतो. मला स्वतःलाही शिकता येतं.’
संस्कृतमध्ये एमए झालेली नक्षत्रा बोडस फ्रेंच भाषेचं शिक्षणही घेतेय. संस्कृत आणि फ्रेंच अशा दोन्ही भाषा ती ऑनलाइन स्वरूपात शिकवते आहे. शाळा-कॉलेजांच्या मुलांबरोबरच केवळ हौस म्हणून या भाषा शिकू इच्छिणारेही तिच्या या डिजिटल वर्गांमध्ये सहभागी होतात. ती म्हणते की, ‘काहीच न करण्यापेक्षा आपण घेतलेल्या शिक्षणाचा वापर इतरांसाठी होत असेल आणि त्यातून थोड्या-अधिक प्रमाणात आपलंही अर्थार्जन होत असेल, तर काय हरकत आहे? पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात अभ्यासलेल्या बऱ्याच गोष्टींची उजळणीसुद्धा यातून होते. त्यामुळे याचा वैयक्तिक पातळीवर मला फायदाच होतो.’
लेखक विराट पवार अनेकांना क्रिएटीव्ह आणि स्टोरी रायटिंगचे ऑनलाइन धडे देत आहे. तो सांगतो की, ‘लेखन हे माझं पॅशन आहे. त्यामुळे लेखनाचं तंत्र इतरांना शिकवताना माझा वेळ छान जातो. अनेक तरुण मंडळी माझ्या माध्यमातून हे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अनिश्चित परिस्थितीत हे ऑनलाइन वर्ग दिलासा देतात.’ स्वतः योग प्रशिक्षक असणाऱ्या प्रेरणा वाडनंही योगाचे ऑनलाइन धडे देणं सुरू केलं. प्रेरणा सांगते की, ‘अनिश्चित काळासाठी हातावर हात ठेवून बसणं मला शक्य झालं नसतं. त्यामुळे मी ऑनलाइन योग वर्ग घ्यायला लागले. खरं तर हे माझ्यासाठीही नवीनच आहे. पण, शेवटी जगण्यासाठी पैसा हवाच. शिकवताना मजा येते आणि मी स्वतःही दिवसभर उत्साही राहू शकते.’
[ad_2]
Source link