जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी सिंदखेड या गावातील खाजगी संस्था कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने शिक्षण विभागाकडे ठरावाद्वारे केली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असले तरी दुसरीकडे गावोगावी शैक्षणिक खाजगी संस्थांना मान्यता देत आहे. परिणामी, जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होत आहेत. गावातील खाजगी संस्थेची मान्यता रद्द करून जिल्हा परिषद शाळेला प्रोत्साहन द्यावे, असा ठराव तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायतीने घेतला आहे.
निलंग्यापासून जवळच ५ किमीवर असलेल्या सिंदखेड येथे जिल्हा परिषद शाळा आहे. तिथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून ८० विद्यार्थी अन् ७३ विद्यार्थिनी अशी एकूण १५३ पटसंख्या आहे. शाळेत एकूण ८ शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी प्रशासनाने गावात खाजगी शिक्षण संस्थेस परवानगी देऊन इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली. विद्यमान संस्था चालकांनी पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गाची मान्यता आणली. गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यास सुरुवात झाली. ही बाब ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामसभा घेऊन गावातील खाजगी संस्थेच्या इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गांची मान्यता रद्द करुन हे विद्यार्थी शाळेस वर्ग करण्यात यावेत, असा ठराव घेतला. तसेच ही संस्था कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणीही शिक्षण विभागाकडे ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे.
निवेदनावर सरपंच नागनाथ आंबिलपुरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अब्रार देशमुख, बालाजी शेडुळे, संभाजी बोलसुरे, राम माडीबोने, सुधाकर पानबोने, कांत जाधव, रावसाहेब आंबिलपुरे, दिलीप मठपती, दिगंबर बऱ्हाणपूरे, सिद्राम कुंभार, संदीप पानबोने, अहमद शेख आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तीन वर्षांपासून शाळेचा पट घसरला…
गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. सन २०२१-२२ मध्ये पटसंख्या २१४ होती. सन २०२२-२३ मध्ये १८६ होती. आता केवळ १५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या दोन- तीन वर्षात जिल्हा परिषदेची शाळा बंद पडेल.
– नागनाथ अंबिलपुरे, सरपंच.