कष्टाची भाकर । बोधपर गोष्टी

जुन्या काळी अरबस्थानात हातिमताई नावाचा एक माणूस कनवाळू, दानशूर आणि परम नीतिमंत म्हणून प्रसिद्ध होता.

एकदा एका मित्राने हातिमताईला म्हटले, “मला तर अलम दुनियेत तुझ्या तोडीची श्रेष्ठ व्यक्ती दुसरी असेल, असं वाटत नाही. तुला तरी असा कुणी भेटला होत का, जो तुला तुझ्याहून श्रेष्ठ वाटला?”

हातिमताईने म्हटले, “एकदा मी गरजू लोकांसाठी अन्नछत्र उघडलं. त्यावेळी मी चाळीस उंट दान केले. कुणाही अतिथीला मुक्तद्वार होतं. मी स्वतः सुद्धा भुकेलेल्यांच्या शोधासाठी बाहेर पडलो. वेशीबाहेर मला एक लाकूडतोड्या भेटला. ताज्या छाटलेल्या काटक्यांची मोळी त्याच्या माथ्यावर होती. मी त्याला म्हटलं, “बंधू, हातिमताईच्या अन्नछत्रात जाऊन तू यथेच्छ भोजन का करत नाहीस?”

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

प्रामाणिकपणा

येथे क्लिक करा

त्यानं उत्तर दिलं, “इमानदारीने कष्ट करून जो आपली भाकरी कमावू शकतो, त्याला हातिमताईच्या औदार्यानं ओशाळं व्हायची गरजच काय?” मी यावर निरुत्तर झालो. तो लाकूडतोड्या नक्कीच माझ्याहून वरचढ होता.”

तात्पर्य : इतरांपुढे आशाळभूत होण्यापेक्षा आणि लाचारी पत्करण्यापेक्षा आपल्या कष्टाने मिळविलेली भाकरी पंचपक्वान्नांहून स्वादिष्ट असते.