इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 25
विषय – मराठी
खालील उतारा वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा
शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नयना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडावेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. ‘कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध.’ असे नयना नेहमी म्हणायची. तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळूवृत्ती भावून जायची. सिमरनला वाटायचे, ‘किती मेहनती आहे हा पक्षी! आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा !”
- वरील परिच्छेदात आलेल्या मुला मुलींची नावे..
- वरील परिच्छेदात वर्णन केलेल्या सुगरण पक्षाचे विशेष गुण.
खालील उतारा वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा
जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी- जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात.
वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडा-झुडपांवरील त्यांच्या नख्यांच्या खुणा, दातांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यांवरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय.
जंगलवाचनाचा आपल्याला छंद लागला, की डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडेझुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, कारण जंगलवाचनाचा अनुभव आपल्याला नवीनवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो.
1. परिच्छेदात आलेल्या प्राण्यांची नावे.
2. प्राण्यांच्या जगाशी एकरूप करणारे घटक.
3. जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात?
4. तुमच्या घरी व शेजारी असलेल्या प्राण्यांच्या कृतीचे व आवाजाचे निरीक्षण करून तुमचे अनुभव लिहा.