[ad_1]
लॉकडाउनच्या काळात वेळ घालवण्यासाठी इंटरनेट आणि गेमिंगचं अॅडिक्शन चांगलंच वाढलंय. पब्जी, ल्युडोसारखे गेम्स भारतात आघाडीवर आहेत. मार्च, एप्रिल या काळसत गेमिंग क्षेत्राची उलाढाल तब्बल १०० टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी देशात सर्वत्र लॉकडाउनमुळे वेतन कपात होत असताना गेमिंग क्षेत्रात मात्र आनंदाचं वातावरण पाहावयास मिळतंय. पूर्वीच्या डेस्कटॉप गेम्सच्या तुलनेत मोबाइल गेम्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. मल्टी गेम प्लॅटफॉर्म मोबाइल प्रिमीअर लीगच्या वापरातही तब्बल ५५ टक्के इतकी वाढ झाली आहे. क्रिकेट, पूल, फ्रूट चॉपसारख्या गेम्सच्या युजर्समध्येही वाढ झाली आहे. याचबरोबर कौशल्य विकसित करणाऱ्या विविध गेम्समध्ये ५० टक्के वाढ झाल्याचं पाहणीतून समोर आलं आहे. या कंपन्याच्या युजर्सच्या संख्येत १५० टक्के इतकी वाढ झाल्याचं पाहणीतून समोर आलं आहे.
क्रिकेटसारख्या गेम्सच्या युजर्समध्ये १०० टक्के वाढ झाली. पूलच्या गेम्समध्ये ८८ टक्के आणि फूडचॉपच्या गेम्समध्ये ५४ टक्के इतकी वाढ झाल्याचंही पाहणीतून समोर आलं आहे. मोबाइल गेम्सच्या युजर्समध्ये होणारी वाढ लक्षात घेता एप्रिल महिन्यातील टॉप १० अॅप्समध्ये पाच गेमिंग अॅपचा समावेश झाला आहे. तर उर्वरित अॅप्समध्ये मीटिंग्ज अॅप आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. यातच काही लोकप्रिय अॅप्सनी गेम्सचाही समावेश केला आहे यामुळे गेम्स खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागलीय. परिणामी शहरातील गेम अॅडिक्ट तरुणांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये गेम्समुळे मानसिक आरोग्य बिघडल्याचं समोर येऊ लागलं आहे. लॉकडाउनच्या आधी महिन्याला अशी १०० प्रकरणं येत होती, ती संख्या आता १७० ते १८०च्या घरात पोहचली आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
याबाबत मानसोपचारतज्ज्ञ सांगतात, की ‘पालकांनी मुलांशी मित्र म्हणून संवाद साधावा. तसं झालं तरच तरुण मुलं, मुली मोबाइलपासून दूर जातील. मुलांना विविध अॅक्टिव्हिटीज आणि त्याच्यासाठी बक्षीस देण्यात यावं. जेणेकरून ते विविध अॅक्टिव्हीटीज करत राहतील. उदाहणार्थ मुलांना रोज स्वयंपाकातील एखादा पदार्थ करण्याची जबाबदारी द्यावी. ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडल्यास त्यांना दोन तास गेम खेळण्याची मुभा दिली जाईल असं सांगावं. जेणेकरून त्यांना नकारातून राग येणार नाही. इतर गोष्टी आणि गेमिंग यात समतोल साधणंही शक्य होईल. यातून अॅडिक्शनचा धोका कमी होऊ शकतो. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात तरुणांना मन रमवण्याची साधनं मर्यादित असल्यानं याकडे ओढ वाढू शकतो. मात्र त्याला मर्यादा असावी.’
अनेक पालक घरात असले तरी ते आपल्या मुलांशी योग्य संवाद साधत नाहीत. जेव्हा संवाद साधतात, तेव्हा ‘माझंच ऐका’ अशा आविर्भावात बोलतात. तरुणांना ते आवडत नाही. परिणामी ते मोबाइलशी मैत्री करतात आणि गेमिंगच्या आहारी जातात. हे प्रमाण इतक्या टोकाला जातं की ते आपल्याच घरच्यांना मारहाण करण्यासही ते मागे-पुढे पाहत नाहीत. अशा वेळी त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करून विशेष समुपदेशन द्यावं लागतं. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात हे प्रमाण वाढू लागलं आहे.
– डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ
लॉकडाउनचा फायदा कुणाला?
१. ओटीटी प्लॅटफॉर्म
२. गेमिंग
३. पॉडकास्ट
४. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग
५. सोशल मीडिया
– गेम खेळणाऱ्यांपैकी ८० टक्के तरुण-तरुणी १८ ते २४ वयोगटातले.
– १० मार्च ते १० एप्रिल या कालावधीत ‘कॉल ऑफ ड्युटी’ पाच कोटींइतका डाउनलोड झाला.
– याच कालावधीत पबजी डाउनलोडिंगचं प्रमाण ५० ते ८० टक्क्यांनी वाढलं.
– एकूण गेमिंग क्षेत्रात १३२ टक्के वाढ.
– गेमिंगच्या माध्यमातून ४० टक्के तरुण करताहेत कमाई
– गेमिंगच्या अॅडिक्शनचं प्रमाण ७० ते ८० टक्क्यांनी वाढलं.
– एप्रिल महिन्यातील टॉप १० अॅप्समध्ये पाच गेमिंग अॅप्सचा समावेश
[ad_2]
Source link