सोशल मीडिया : सोशल मीडियावर गोष्ट सांगायचीय? घ्या चॅलेंज – want to tell a story? take the challenge

[ad_1]

ज्ञानेश्वरी वेलणकर

लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेच्या चॅलेंजेसचं पीक आलं. ऑनलाइन अंताक्षरीपासून जुने फोटो, त्याबरोबर जोडल्या गेलेल्या आठवणी सगळे शेअर करू लागले. जीव रमवण्यासाठी आणि लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सुरू झालेल्या या चॅलेंजेसना सर्व वयोगटांतून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र यातून आपल्या सर्जनशीलतेलाही वाव मिळावा आणि त्या प्रक्रियेत प्रत्येकालाच काहीतरी शिकता यावं या हेतूनं आकाराला आलं एक अनोखं चॅलेंज, ‘द कथा चॅलेंज‘. गोष्टी सांगण्याची आणि त्या ऐकण्याची सवय सध्या कुठेतरी लोप पावत चालली आहे. सध्या हातात वेळ आहे, तर ही सवय पुन्हा एकदा लावून का घेऊ नये या हेतूनं चिन्मय मुनघाटे या तरुणानं इन्स्टाग्रामवर ‘द कथा चॅलेंज’ला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.


नेमकं काय?

या चॅलेंजमध्ये ऐकणं, बघणं, समजणं आणि लिहिणं अशा चार प्रक्रियांचा समावेश आहे. समूहातील एक व्यक्ती कथेचा काही भाग लिहायला घेते, ती कथा वाचून दाखवताना किंवा सादर करतानाचा स्वतःचा व्हिडीओ शूट करतो, तो सोशल मीडियावर पोस्ट करतो. समूहातील दुसऱ्या कुणा व्यक्तीला चॅलेंज देतो. ज्या व्यक्तीला हे चॅलेंज मिळतं, त्या व्यक्तीनं ती कथा पुढे न्यायची असते आणि स्वतःचा व्हिडीओ पोस्ट करत आणखी कुणाला तरी चॅलेंज पास करायचं असतं. अशा प्रकारे ५ ते ६ लोकं मिळून एक संपूर्ण कथा लिहितात. शेवटच्या व्यक्तीवर कथेचा शेवट करण्याची जबाबदारी असते. कथेचे व्हिडीओ स्वरूपातले सगळे भाग मग एकत्र केले जातात आणि त्याचा एक अखंड व्हिडीओ तयार केला जातो. हा व्हिडीओ ‘द कथा चॅलेंज’च्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केला जातो. त्यामुळे अनेक मंडळींनी रचलेल्या आणि सांगितलेल्या एका कथेचा आस्वाद बघणारे घेऊ शकतात. यात वेळेचं बंधन असल्यामुळे प्रत्येकाचा चांगलाच कस लागतो. व्हिडीओला ३ मिनिटांची मर्यादा असते. चॅलेंज मिळाल्यापासून २४ तासात तुम्हाला तुमचा भाग तयार करायचा असतो. आधीच्या मंडळींनी कथा कुठवर आणली ते ऐकणं, बघणं, समजून घेणं, आपला अर्थ लावणं आणि मग ती कथा पुढे घेऊन जाणं अशा अनेक गोष्टी या चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला कराव्या लागतात. कथा लिहिण्यासाठी भाषेचं कुठलंही बंधन नाही.


कसा आहे प्रतिसाद?

कथा चॅलेंजच्या माध्यमातून कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता या दोहोंची चांगली तालीम होते. वेगवेगळ्या ठिकाणच्या आणि वेगवेगळी विचारसरणी असलेल्या व्यक्तींबरोबर काम करायला मिळतं. समूहातील इतर मंडळींशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची सुसंधीही मिळते, असं यात सहभागी झालेले लोक सांगतात. या चॅलेंजअंतर्गत आत्तापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली भाषेत कथा लिहिल्या गेल्या आहेत. काही महिलांना ही संकल्पना विशेष भावल्यामुळे त्यानी गुजरातहून कथेचे ५ भाग रेकॉर्ड करून पाठवले आहेत. लवकरच इंडोनेशियन ‘बाहसा’या भाषेतील कथा देखील या चॅलेंजमार्फत सादर होणार आहे.

माहिती देणारे आणि मनोरंजन करणारे खूप स्रोत सध्या आपल्याभोवती आहेत. त्यांचा आशय सतत आपल्यासमोर येत असतो. त्यामुळे स्वतःशी संवाद साधायला वेळच मिळत नाही. आपल्याला काही सांगायचंय का, आपल्याकडे सांगण्यासारखं काही आहे का, हे पडताळून बघण्याची वेळच येत नाही. ‘कथा चॅलेंज’च्या माध्यमातून मला लोकांना स्वतःला हा प्रश्न विचारायला भाग पाडायचंय. कथा सांगण्या-ऐकण्याची आपलीच परंपरा थोडी घासूनपुसून पुढे आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय.

चिन्मय मुनघाटे, फाऊंडर, द कथा चॅलेंज



[ad_2]

Source link

Leave a comment