महापरीक्षा पोर्टल बंद! : 72 हजारांची महाभरती या पद्धतीने होईल

राज्यात 72 हजार पदांच्या महाभरतीला सुरवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. दरम्यान, ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.


फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या महाभरतीला महाविकास आघाडीने मूर्त स्वरुप दिले आहे. गृह, पाणी पुरवठा, शिक्षण, सामाजिक न्याय, महसूल, आरोग्य, पशुवसंर्धन यासह अन्य विभागांकडून रिक्‍त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये सद्यस्थितीत पावणेदोन लाख रिक्‍त पदे आहेत. राज्याची आर्थिक स्थिती पाहता पहिल्या टप्प्यात 70 ते 72 हजार पदांची भरती केली जाणार असून त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे आठ ते साडेआठ हजार कोटी द्यावे लागणार आहेत.


दरम्यान, महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी अन्‌ खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पोर्टलला केला विरोध आणि त्रुटी पडताळणी समितीच्या अहवालानुसार हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासनाच्या वतीने पोर्टलबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यामध्येही तब्बल 85 टक्‍के विद्यार्थ्यांनी पोर्टल बंद करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय सरकारने घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला नसल्याचेही सांगण्यात आले.


राज्यातील विविध विभागांमधील रिक्‍त पदांच्या आरक्षण पडताळणीचे काम सुरु आहे. त्यामध्ये पाणी पुरवठा विभाग, शिक्षण, महसूल, आरोग्यसह अन्य विभागांचा समावेश आहे. आता प्रत्येक विभाग स्तरावर पद भरतीची प्रक्रिया राबविली जाईल. त्यानुसार संबंधित विभागांची कार्यवाही सुरु झाली आहे, असे सामान्य विभागाचे अव्वर सचिव रसिक खडसे यांनी सांगितले.

ठळक बाबी
– शासकीय विभागनिहाय रिक्‍त पदांची माहिती संकलित
– पहिल्या टप्प्यात आरोग्य, गृह, पाणी पुरवठा, शिक्षण विभागातील रिक्‍त पदांची भरती
– पहिल्या टप्प्यातील पदांच्या आरक्षण पडताळणीचे काम युध्दपातळीवर
– प्रत्येक विभागांनी त्यांच्या स्तरावर राबवावी भरती प्रक्रिया : सरकारच्या सूचना
– त्रयस्थ संस्थेतर्फे ऑडिट : विद्यार्थ्यांच्या तक्रारी अन्‌ तत्काळ भरतीमुळे घेतला निर्णय

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

Leave a comment