इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 21

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस  21 

विषय  – मराठी 

प्रकट वाचन 

विद्यार्थ्यांनी खालील उतारा यांचे प्रकट वाचन करावे

 उतारा क्रमांक 1

निसर्ग अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे पक्षीनिरीक्षण. अगदी पक्षांसारखे आकाशात उडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माणसाने पक्ष्यांना समोर ठेवूनच विमानाचा शोध लावला होता. राइट बंधूंनी विमान बनवण्याआधी अनेक देशांमध्ये अनेक संशोधक आकाशात उडण्याचे वेगवेगळे प्रयोग करत होते. अगदी पक्षांची पिसे वापरून त्याचे मोठे पंख तयार करूनही उडण्याचे प्रयत्न झाले आहेत! खरंच पक्षीविश्व इतके अद्भुत आणि रम्य आहे, की लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार अशा अनेकांना अजरामर रचना करण्यास पौराणिक काळापासून प्रेरणा देत आले आहे. या पृथ्वीवर अशी एक इंच जागा नाही, जिथे पक्ष्यांची सावली पडली नसेल. पक्षीनिरीक्षण हा ‘शून्य’ पैसे खर्च येणारा जगातला लोकप्रिय छंद आहे.

उतारा क्रमांक 2

एकदा सानेगुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संत्री खात होते. टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफले, साली गोळा केल्या. कागदात बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. सानेगुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला, तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करताच ते सानेगुरुजी आहेत, हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले, “गुरुजी, आमचे चुकले. क्षमा करा.’

गुरुजी नम्रपणे म्हणाले, “मी कोण तुम्हांला क्षमा करणार ? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये, ती स्वच्छ केली.’ म्हणून मी

अशी ही गुरुजींची वृत्ती ! आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही.

 उतारा क्रमांक 3

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रियांका सुट्टीनिमित्त आई व अमित सोबत मामाच्या गावी गेली. एके दिवशी ती कपडे धुण्यासाठी आई व अमित सोबत नदीवर गेली असताना काठावर खेळणारा अमित पाय घसरून नदीच्या पाण्यात पडला व बुडू लागला. आई घाबरून गेली. प्रियांकाने प्रसंगावधान राखून, धुण्यातील एक साडी घेतली. साडीचे एक टोक तिने अमितकडे फेकले. अमितने ते टोक पकडले. प्रियांकाने साडी हळूहळू ओढून अमितचे प्राण वाचवले.

प्रियांकाच्या धाडसाची दखल घेऊन तिला ‘बालशौर्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

 उतारा क्रमांक 4

कीटकवर्गात सर्वांत जास्त उदयोगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. मुंग्या परिस्थितीनुसार विशिष्ट गंधकण सोडतात. या गंधकणांच्या साहाय्याने त्या इतर मुंग्यांच्या संपर्कात राहतात व आपले संरक्षण, शत्रूवर हल्ला, अन्नसाठा इ. कार्ये करतात. स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतात.

Leave a comment