कोरोनाला रोखण्यासाठी भारतात 24 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र भारतातील वाढता कोरोनाबाधितांचा आकड्यामुळं सध्या देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन आहे.
17 मेपर्यंत या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे, मात्र लॉकडाऊनशिवाय इतर कोणताही पर्याय कोरोनाला रोखण्यात असमर्थ असल्याचे मोदींचे मत आहे. त्यामुळं 17 मेनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनबाबत सोमवारी (11 मे) रोजी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली होती. तर, आज रात्री 8 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनपेक्षा चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम वेगळे असतील. याबाबत मोदींनी एक प्लॅन तयार केला आहे.
लॉकडाऊन 4.0मध्ये होणार असे बदल
लॉकडाऊन 3 मध्ये राज्यांत जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार जनजीवनात सूट देण्यात आली. याचा पुढचा टप्पा आता लॉकडाऊन 4 मध्ये असणार आहे.
यात संपूर्ण जिल्हा हा रेड झोन जाहीर न करता, ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, अशी प्रतिबंधित क्षेत्रं म्हणजेच कंटेन्टमेंट झोन वगळता जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिले.
रेड झोनमध्येही देणार सूट
मोदींच्या या प्लॅननुसार रेड झोन म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील व्यवहार ठप्प न होता, केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील जनजीवनावरच त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे देशातील सर्वच राज्यातील आर्थिक व्यवहारही बऱ्याच अंशी सुरळीत होण्याची शक्यता आहे.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या पर्यायाला सहमती दर्शवली तर चौथ्या डॉकडाऊनच्या टप्प्यात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग राहण्याची शक्यता आहे.
परराज्यातील मजूरांची अशी करणार सोय
प्रत्येक राज्यातील परप्रांतीय मजुरांना पुढील 8 ते 10 दिवसांत त्यांच्या राज्यात पाठविण्यात येईल. मजुरांच्या स्थलांतरणामुळे दोन बाबी घडण्याची शक्यता आहे,
1 ज्या राज्यांतून हे स्थलांतर होईल, त्या राज्यांमध्ये मजुरांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे,
2 . तर दुसऱ्या बाजूला, ज्या राज्यांत हे मजूर परततील त्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.
ज्या राज्यांत रुग्ण संख्या वाढेल, त्या ठिकाणी अधिक तयारीत राहण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. सद्यस्थितीत स्थलांतरितांच्या प्रश्नांकडे आणि त्यांच्या मनस्थितीकडे माणुसकीच्या दृष्टीतून पाहण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.