राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक महापालिका, खासगी अनुदानित शाळांमध्ये कोविड केअर सेंटर-२ उभारण्यात येत आहेत. यासाठी आवश्यकतेनुसार अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
त्यासाठी अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती विभागीय शिक्षणाधिकाºयांकडून शिक्षण विभागाने मागविली आहे.
कोविड केअर सेंटरवर शिक्षकांचीच ड्युटी लावली जाणार आहे. पालिका शाळांतील शिक्षकांना १०० टक्के उपस्थितीचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे शिक्षकांचा आणि परिणामी पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यात येत असल्याचा नाराजीचा सूर शिक्षकांमध्ये आहे.
मुंबई विभागात शाळांमध्ये काम करणारे बहुसंख्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी दूरच्या उपनगरात राहतात. त्यातच अनेक ठिकाणे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे शिक्षकांना प्रवास करणे शक्य नाही. अनेक शिक्षकांना विविध व्याधी आहेत.
त्यामुळे अन्य विभागातून कोरोनाच्या कामासाठी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांना या कामातून वगळावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.
तर, आधी नाकाबंदीच्या ठिकाणी, मग मद्यविक्रीच्या दुकानांसमोर आणि आता कोविड केअर सेंटरमध्ये शिक्षकांची ड्युटी लावण्यात येत आहे. त्यांच्या सुरक्षेचे काय? या कामासाठी शिक्षकच का? असा सवाल करत शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनीही याला विरोध केला आहे.
आधीच शिक्षकांना पहिली ते आठवीचे निकालपत्रक वेळेत देण्याच्या सूचना आल्या आहेत. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके तयार करायची आहेत. दहावी आणि बारावीचे निकाल लावायचे आहेत. त्यातच आता कोविड केअर सेंटरवरही शिक्षकांचीच ड्युटी लावली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक ज्ञानदान करण्यासाठी आहेत की फक्त कारकुनी कामे करण्यासाठी आहेत, असा सवाल शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने संरक्षण विमा कवच पुरवावे
शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांची माहिती युद्ध पातळीवर संकलित करण्यात येणार आहे. शिक्षक या कामासाठी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तयार आहेत. परंतु शासनाने शिक्षकांसाठी योग्य त्या आरोग्य सुविधा, पीपीई किट, संरक्षण विमा कवच पुरवावे, अशी मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, अंधेरी येथील शिक्षक उदय नरे यांनी केली आहे.