[ad_1]
महाराष्ट्रीय पदार्थांचा डंका
युट्यूबवर ‘मधुरा रेसिपीज’चे व्हिडीओ पाहणाऱ्या गृहिणींची संख्या काही लाखांत आहे. तब्बल ३० लाख सबस्क्राइबर्स असलेल्या मधुरा बचल यांचा प्रवास १० वर्षांचा आहे. २००९ साली बँकिंग क्षेत्रातली चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं. त्या दरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. मुलीला वेळ देताना उत्पन्नाचा स्रोत कसा सुरू राहील या विचारातून युट्यूबचा पर्याय पुढे आला. विविध पाककृती शोधत असताना, त्यांना केवळ दाक्षिणात्य, पंजाबी, गुजराती किंवा चायनीज रेसिपीज दिसत होत्या. या गर्दीत मराठी पदार्थ कुठेच नव्हते. मात्र मराठी पदार्थांविषयी लोकांना कळलं तर लोक नक्की ते करून पाहतील, असा विश्वास मधुरा यांना होता. याच विश्वासातून ‘मधुरा रेसिपीज’ चॅनल सुरू झालं. त्या म्हणतात, ‘अगदी पारंपरिक पदार्थ लोकांना करून पाहायला आवडतात. अलीकडेच एक रेसिपी व्हिडीओ चक्क आठवडाभर ट्रेंडिंग करत होता. कधी काळी आजीनं बनवलेले पदार्थ आम्हीही बनवतो आहोत अशा प्रतिक्रिया लोकांकडून मिळतात हे या चॅनेलचं यश आहे.’ राज्यातील विविध भागांमधले खाद्यपदार्थ जाणून घेण्यासाठी त्याचं वाचन आणि फिरस्ती सुरूच असते.
येवा कोकण ‘जगभर’ आसा
अनिकेत रासमचा जन्म मुंबईतला. मात्र त्याला नेहमीच कोकणाची ओढ लागलेली असायची. गावच्या ओढीपायी अचानक एके दिवशी अनिकेतनं चांगल्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकला आणि कायमसाठी गाव गाठलं. तिथे तो बाबांच्या कामात हातभार लावू लागला. अशातच एका मित्रानं ब्लॉगिंग करण्याचा सल्ला दिला. मंगलोर एक्स्प्रेसनं केलेल्या कोकणच्या प्रवासाचा पहिला व्हिडीओ अनिकेतनं युट्यूबवर ‘गोष्ट कोकणातली’मधून पोस्ट केला. त्यानंतर बऱ्याच व्हिडीओनंतर त्याच्या आईचा चुलीवर स्वयंपाक करतानाचा त्याचा व्हिडीओ भलताच हिट झाला आणि त्याच्या चॅनलवरुन कोकण दर्शन होऊ लागलं. याबाबत अनिकेत म्हणतो, ‘व्हिडीओंना मिळणारा प्रतिसाद पाहून आई-बाबांची चिंता मिटली आहे. मला कोकणातील दगड अन् दगड युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाला दाखवायचा आहे. कोकणातून बाहेर जाणाऱ्या तरुणांच्या मनात गावात राहूनच ओळख निर्माण करण्याचा विश्वास द्यायचा आहे.’ १ जानेवारी २०१८ला त्याच्या ‘गोष्ट कोकणातली’ या युट्यूब चॅनलचा प्रवास सुरू झाला होता. आतापर्यंत त्यानं कोकणचं निसर्गसौंदर्य, वैशिष्ट्यांचं दर्शन घडवणारे १६३ व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्याच्या सबस्क्राइबर्सच्या संख्येनं १ लाखाचा टप्पा ओलांडला आहे. अनिकेतच्या प्रयत्नांना मुंबई, कोकणातूनच नव्हे तर जगभरातून दाद मिळतेय.
साहित्याला साज नवा!
तरुणांच्या काळजाला हात घालणाऱ्या ‘सृजन डिजिटल’ला लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. मराठी साहित्य आणि आताची तरुण पिढी यांच्यामध्ये भक्कम दुवा म्हणून उभं राहण्याचं काम काही तरुणांनी सुरू केलं आहे. साहित्याकडे पाहून नाकं मुरडणाऱ्या तरुणांमध्ये, त्यांच्या कलानं साहित्यप्रेम रुजवण्याला हा मानस भलताच हिट ठरतो आहे. मात्र हे साहित्य ब्लॉग किंवा यूट्यूबपेक्षा वेगळ्या फॉरमॅटमध्ये आणता येईल विचारातूनच सृजन डिजिटलचा जन्म झाल्याचं आर्या पाठक सांगते. या व्यासपीठाच्या माध्यमातून ‘काफिला’ नावाचा कवितावाचनाचा ओपन माईक कार्यक्रम तिनं सुरू केला आहे. ‘काफिला’चे कार्यक्रम आतापर्यंत पुणे, कोल्हापूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथे झाले आहेत. या कार्यक्रमांत मराठी भाषेचं बंधन वगळता इतर कुठलंही बंधन नाही. विशेष म्हणजे, ‘सृजन’नं पहिल्यांदाच मराठीमध्ये पॉडकास्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पॉडकास्टमध्ये अनेकांच्या पर्सनल डायरीतील तो ‘दुमडलेला कोपरा’ वाचून दाखवला जाणार आहे. तर ‘बुकमार्क’च्या माध्यमातून प्रवाहात असलेली तसेच विस्मृतीत गेलेल्या अनेक पुस्तकांचं परीक्षण, वेगळ्या पद्धतीनं आणला जातंय. ‘मराठी भाषेतील समृद्ध साहित्य जगभरात पोहोचवण्यासाठी सोशल मीडियासारखं खणखणीत माध्यम दुसरे कुठलेही नाही’, असे आर्या सांगते.
[ad_2]
Source link